कोल्हापूर : जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचार्यांचा संप सुरु आहे. राज्यभरात सुरु असलेल्या या संपाविरोधात आता लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यात कोल्हापूरात सरकारी कर्मचारी संपाविरोधात बेरोजगार तरुण आणि शेतकर्यांनी मोर्चा काढला आहे. जुनी पेन्शन बंद करा ती लागू करू नका. आम्ही अर्ध्या पगारावर कामाला तयार आहे अशा भावना याठिकाणी आंदोलनात आलेल्या तरुणांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूरच्या दसरा चौकातून बेरोजगार तरूणांचा मोर्चा निघाला. यातील आंदोलक म्हणाले की, मूळात राज्यात सुरू असणारा मोर्चा आमदार खासदारांना पेन्शन मिळते म्हणून आम्हाला पण द्या यासाठी आहे. या कुणालाही पेन्शन देऊ नका. ज्यांना लाख-दीड लाख रुपये पगार आहे ते भविष्यासाठी आर्थिक नियोजन करू शकत नसतील तर त्यांचा उपयोग काय? शेतकर्यांना पाहिजे ते उत्पन्न मिळत नाही. १२ तास काम करून त्याला दाम मिळत नाही. कर्मचारी ८ तास ड्युटीतील किती तास काम करतात?, असा सवाल आंदोलक विद्यार्थ्यांनी केला.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनीही या संपाला विरोध केला. नवीन पिढी अधिकारी होण्यासाठी इच्छुक आहे. त्यांना कामावर घ्या. आम्हाला पेन्शन नको. पगार वेळेवर द्या. रखडलेल्या नियुक्त्या लवकर भरा. कंत्राट पद्धतीने अनेक पदे भरली जातायेत. जे काम लाख लाख पगार घेऊन प्राध्यापक करतात तेच काम कंत्राटावर २० हजारांवर केले जाते. सरकारने संपकर्यांच्या मागण्या मान्य करू नये असा सूर स्पर्धा परीक्षा देणार्या तरुणांमधून निघत आहे.