---Advertisement---
धुळे : विवाहित प्रेमीयुगुलाने एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना साक्री तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. विशेषतः मयत दोघा प्रेमी युगलला अपत्ये असूनही त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील एका २८ वर्षीय तरुण आणि २५ वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते. विशेषतः ते दोघेही एकाच समाजाचे होते. चार वर्षांपूर्वी दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाले. दोघांचे सासर देखील एकाच गावाचे होते.
दरम्यान, या दोघांनी गावातील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन सोबतच आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, दोघांनी एकाच वेळी एकत्रीतपणे आत्महत्या का केली याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.