---Advertisement---
जळगाव : शहरात वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी ( १० सप्टेंबर) रोजी विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी तिच्या माहेरच्यांनी सासरच्यांविरुद्ध गंभीर आरोप केल्यानंतर विवाहितेच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा शहरातील एका विवाहितेने आत्महत्या केली. यातही माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिता किरण कोळी (वय ३१, रा. हरिविठ्ठल नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी पती कामावर तर मुल शाळेत गेल्यावर घरी एकटीच असलेल्या अनिता कोळी यांनी गळफास घेतला. सायंकाळी मुले शाळेतून घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. अनिता कोळी यांचे पती केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी आहे. शुक्रवारी अनिताचे पती कामावर गेले होते, तर दोघ मुले शाळेत गेले होते. त्यावेळी घरी एकट्याच असलेल्या अनिता यांनी घराच्या मागील खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुले शाळेतून घरी आले असता त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी मुलांनी आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत.
मयत अनिता कोळी यांनी आत्महत्या केली नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिला असून त्यात घातपाताचा संशय व्यक्त केला. या अर्जानुसार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.