सामूहिक विवाह काळाची गरज

वेध

– नंदकिशोर काथवटे

दोघे करावी उभी, वाजंत्री बहू गलबला न करणे, कुर्यात सदा मंगलम् सावधान…! मंगलाष्टकाच्या या शेवटच्या ओळी कानी पडल्या की, वधुपित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसतात. विवाह सोहळा तसा खर्चिकच आहे. प्रत्येकच वधुपित्याला आपल्या कन्येचा विवाह सोहळा थाटात करायचा असतो. पैसे नसतानाही लोकांपुढे पदर पसरून, प्रसंगी कर्ज काढून आपल्या कन्येचा विवाह सोहळा पार पाडून वधुपिता धन्य होतो. मात्र, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे लग्न सोहळा थाटात करणे प्रत्येकाला जमेल असे नाही. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणा-या आदिवासींच्या जीवनात आधीच अंधार आहे. अशावेळी आपल्या कन्येचा विवाह सोहळा कसा करायचा, असा यक्षप्रश्न वधुपित्याच्या मनात येतो. अशा बापांच्या मदतीला आता मैत्री परिवार व पोलिस विभाग धावून आले आहे.  नुकताच गडचिरोलीत १२७ आदिवासी वधुवरांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

मैत्री परिवार गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीतील गरीब आदिवासी मुलामुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करीत आहे. यासाठी येथील पोलिस विभाग आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मैत्री परिवार हा मंगल सोहळा हजारो लोकांच्या साक्षीने पार पाडीत आहे. यावेळी १२७ जोडप्यांना विवाह बंधनात अडकवतानाच नक्षल चळवळ सोडून आलेल्या आठ आत्मसमर्पित नक्षल्यांचेही वैवाहिक आयुष्य सुखकर करण्यासाठी मैत्री परिवाराने मोलाची कामगिरी केली आहे. भरकटलेले आदिवासी नक्षल चळवळीकडे ओढले जातातत्यामुळे त्यांच्या आयुष्य धोक्यात येते. मात्र, जेव्हा चळवळीत आपले हित नसून आपले आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, याची समज आल्यानंतर अनेक युवक-युवती पोलिसांपुढे आत्मसमर्पण करतात.अशा आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनावर पर्यायाने पोलिस विभागावर येऊन पडते. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस विभागही मैत्री परिवाराच्या या महत्कार्यास हातभार लावून पुढे सरसावला आहे आणि आठ आत्मसमर्पित नक्षल्यांचे या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह लावून दिले.

नक्षल्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी आत्मसमर्पण केल्याने पुढील आयुष्य त्यांना सुखासमाधानाने जगता यावे यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन आठ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांना बोहल्यावर चढविले. गडचिरोली शहरात पार पडलेल्या या लग्न सोहळ्याची चर्चा गडचिरोलीपासून संपूर्ण राज्यात पसरली आहे. हा अभिनव सोहळा अख्ख्या समाजाला दिशा देणारा आणि गरिबांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे. मैत्री परिवाराचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण या परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रा. प्रमोद पेंडके, गडचिरोली शाखेचे निरंजन वासेकर आदी पदाधिका-यांनी व मैत्री परिवारातील सदस्यांनी हा सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अतिशय शिस्तप्रिय यंत्रणा उभारली होती. आदल्या दिवशीपासूनच वधू-वरांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था, लग्न कार्यासाठी उभारलेला भव्य शामियाना, शहरातून काढण्यात आलेली अप्रतिम मिरवणूक, वधू-वरांचा स्वागत सोहळा, सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था यासारख्या बारीकसारीक गोष्टी मैत्री परिवाराने अतिशय चोखपणे केल्या.

यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या पुढाकाराशिवाय हा सोहळा यशस्वी करणे शक्य नव्हते. पोलिस विभागाचे अधिकारीसुद्धा यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. ज्या आदिवासींना दोन वेळच्या जेवणासाठी पायपीट करावी लागते. त्या आदिवासी युवक-युवतींचा विवाह सोहळा इतक्या दिमाखात साजरा करून मैत्री परिवार व पोलिस विभागाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.  गडचिरोलीतील ही सामूहिक लग्नाची गोष्ट महाराष्ट्राच्या पटलावर उमटविण्यात मैत्री परिवार व पोलिस विभागाने मोलाची कामगिरी बजाविली आहे. naxal marriage हा आदर्श समोर ठेवून इतरही जिल्ह्यांमध्ये तसेच गावागावांमध्ये असे सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले तर गोरगरिबांना त्यांचा निश्चितच लाभ होईल.  अशा प्रकारचे सामूहिक विवाह ही आता काळाची गरजच झाली आहे.

९९२२९९९५८८