अरे देवा, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

विरुधुनगर : तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. या स्फोटाच्या घटनेमुळे कारखान्यातील ९ कामगारांचा मृत्यू झाला, तर इतर सहा कामगार गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. सहा गंभीर जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विरुधुनगर जिल्ह्यातील वेंबकोट्टईमधील मुथुसामीपुरम येथे हा फटाका कारखाना आहे. कारखान्याच्या केमिकल मिक्सिंग रूममध्ये हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या स्फोटात कारखान्याजवळील चार इमारतींचेही नुकसान झाले आहे.

तामिळनाडूमध्ये फटाक्यांचा मोठा उद्योग आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्हा फटाके निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात विरुधुनगर जिल्ह्यातील दोन फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट झाले होते. रंगपलायम आणि किचिन्यकनपट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर १५ हून अधिक जण जखमी झाले होते.