प्रयागराज महाकुंभ मेळ्यात भीषण आग; सिलिंडर स्फोटामुळे 20-25 तंबू जळून खाक

प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. शास्त्री पूल आणि रेल्वे पुलामधील सेक्टर पाच परिसरात सिलिंडर स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सिलिंडर स्फोटामुळे आग भडकली
सिलिंडरच्या स्फोटामुळे आग भडकून या तंबूंनी रौद्र रूप धारण केले आहे. आगीच्या भीषणतेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर हवा असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे.

हेही वाचा : विद्येच्या मंदिरात चाललंय तरी काय ! शाळेच्या कार्यालयात शिक्षक-शिक्षिकेचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल 

जीवितहानी नाही, परंतु मोठी वित्तहानी
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, तंबूंसोबतच अनेक महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे. तंबूंच्या सिलिंडरमुळे स्फोट होत असल्याने आग अधिकच भडकली आहे.

एनडीआरएफ आणि अग्निशमन दल प्रयत्नशील
एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाकुंभ क्षेत्रातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.

या घटनेने महाकुंभात गोंधळाचे वातावरण
महाकुंभ मेळ्यात हजारो लोक उपस्थित असल्यामुळे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रशासनाकडून परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण दक्षता घेतली जात आहे.