मुंबई: अंधेरीतील ओशिवरा एसवी रोडवरील प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास लागलेल्या या आगीने उग्र रूप धारण केले असून, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, लाकडी फर्निचरच्या मोठ्या प्रमाणावरील साठ्यामुळे आग वेगाने पसरली आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली
ओशिवरा फर्निचर मार्केट हे लाकडी आणि इतर प्रकारच्या फर्निचरसाठी प्रसिद्ध आहे. या आगीत जवळपास दहा ते बारा दुकाने जळून खाक झाली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत असून, आगीचा धूर लांबवर दिसत आहे.
या आगीमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी मार्केटच्या आसपासच्या भागात लोकांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. काही दुकानातील मालकांनी स्वतःच्या दुकानदारांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग इतकी भीषण होती की त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले.
अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू
अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न करत असून, आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही, मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
आगीचे नेमके कारण समजण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील काही तासांमध्ये परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा आहे.