लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये भीषण जंगलात लागलेल्या आगीने हाहाकार उडवला आहे. या विनाशकारी आगीत आतापर्यंत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, २ हजारहून अधिक घरे आणि उंच इमारती जळून खाक झाल्या आहेत.
हजारो लोक विस्थापित; गव्हर्नरने जाहीर केली आणीबाणी
लॉस एंजेलिसमधील हजारो रहिवाशांना त्यांच्या घरांमधून बाहेर पडावे लागले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे.
ताशी ७० मैल वेगाने वारे; आगीचा वेगाने प्रसार
ताशी ७० मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग वेगाने पसरत आहे. आग पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये लागली होती आणि तिचा फैलाव लीडिया, वुडली, आणि सनसेट भागांपर्यंत झाला. सुमारे ७० हजार एकराहून अधिक क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
हॉलिवूडच्या जीवनावर मोठा परिणाम
लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचे प्रमुख निवासस्थान असून, या आगीमुळे चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हॉलिवूड सीटीमधील अनेक अलिशान घरे आणि उंच इमारतींना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया
लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राने या आगीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. तिने तिच्या घरातून आगीच्या वणव्याचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, “माझ्या संवेदना येथील प्रभावित सर्वांसोबत आहेत. आपण सर्वजण सुरक्षित राहू, अशी आशा आहे.” प्रियांकाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करणाऱ्या अग्निशमन दलाचे आभार मानले आणि त्यांना “अविश्वसनीय धाडसी” म्हटले.
आग विझवण्यासाठी रात्रभर प्रयत्न
अग्निशमन दलाकडून सतत प्रयत्न सुरू असून त्यांनी तीन मोठ्या आगींवर नियंत्रण मिळवले आहे. हेलिकॉप्टर्स आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या या वणव्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही या प्रदेशातील आतापर्यंतची सर्वात विनाशकारी घटना मानली जात आहे.