मुंबई : मंत्री दादा भुसे यांनी शेतकर्यांकडून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे. संजय राऊतांच्या या ट्विटवर आज विधानसभेत निवेदन मांडत दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणाची जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हावी. या प्रकरणात मी दोषी आढळल्यास मंत्रिपदाचा, आमदारकीचाच काय संपूर्ण राजकारणातून निवृत्त होईल. तसेच जर या प्रकरणात खोटं आढळून आल्यास त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हान दादा भुसे यांनी दिलं.
दादा भुसे पुढे म्हणाले की, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार यांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात. दादा भुसेंनी असं वक्तव्य करताच विरोधीपक्षातील आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘दादा भुसे हाय हाय’ अशा घोषणा देखील सभागृहात देण्यात आल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत दादा भुसे यांना सुनावले. तुम्हाला काय मांडायचं आहे ते मांडा, मात्र तुम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख यांचं नाव घेण्याची गरज नाही.
काय म्हटलयं राऊतांच्या ट्विटमध्ये
संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर आरोप करत एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेर्स शेतकर्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईलविशेष म्हणजे ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊत यांनी टॅग केलं आहे.