चोपडा : दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटात जमणारा भक्तांचा मेळा, तिथे होणारा विठू नामाचा गजर, तिथल्या उत्साह आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती चोपडेकरांनी घेतली. येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातर्फे भव्य समता दिंडी, श्री गोवर्धन पालखी व त्यानिमित्त डोळ्याचे पारणे फिटतील अशा चोपड्यात पहिल्यांदाच रंगलेल्या रिंगण सोहळ्याचा अनुभव हजारो आबालवृद्धांनी घेतला. ‘…. स्वर्गी नाही असा सोहळा’ या उक्तीची प्रचिती चोपडेकरांना या निमित्ताने आली.
भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील विविध विभागांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याचा आरंभ सकाळी ९.०० वा. पालखी पूजनाने करण्यात आला. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानासमोरील मंदिरात उद्योजक विठ्ठलदास गुजराथी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून तसेच गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील व केंद्रप्रमुख दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला आरंभ करण्यात आला.
शहराच्या मुख्य मार्गावरुन ढोल ताशांच्या गजरात व श्री विठ्ठलाचा नामघोष करत महिला मंडळ माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे लेझीम पथक, झांज पथक, भगव्या पताकाधारी बाल वारकरी, तुळसधारी व कलशधारी मुली व विद्यार्थी सहभागी झाले होते. अकुलखेडा येथील भजनी मंडळाच्या भजनांनी या दिंडीत वेगळाच गोडवा आणला. अवघ्या शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर महिला मंडळ शाळेच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष पुनम गुजराथी यांनी अश्वाचे व अश्वस्वार भूपेंद्र गुजराथी यांचे पूजन केले. त्यानंतर मोठ्या उत्साहात व माऊलीच्या जयघोषात अश्व रिंगण, गाईचे, बैलाचे, कलशधारी महिला- मुलींचे, तुळसधारी महिलांचे, भागवत पताकाधारी, बालवारकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे रिंगण पार पडले. तसेच तसेच आशिष व पूनम गुजराथी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महाआरती करण्यात आली.
अवतरले संत भूवरी…
या दिंडीतील पंढरीचा पांडुरंग, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, सावता माळी, रोहिदास, गोरा कुंभार, मुक्ताबाई, जनाबाई यांच्या आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी तसेच विविध प्रकारच्या फुगडी खेळणाऱ्या मुलींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर संतांचा परिचय मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी करून दिला.
या रिंगण सोहळ्यामध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, ॲड. घनश्याम पाटील, चंद्रहास गुजराथी, डी. पी. साळुंखे, जीवन चौधरी, हितेंद्र देशमुख, ज्योती पावरा, शशिकांत पाटील, तुकाराम पाटील, दिनकर देशमुख, रोहिणी पाटील, रामचंद्र भादले, डॉ. रवींद्र निकम, डॉ. सुभाष देसाई, कांतीलाल पाटील, नगर वाचन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एस. टी. कुलकर्णी, रोटरी क्लबचे सदस्य एम. डब्ल्यु. पाटील, इंजी. विलास पाटील, विलास पी. पाटील, इनरव्हील क्लबचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्यासह भगिनी मंडळाच्या पदाधिकारी शहरातील नागरिक, शिक्षक, पालक, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी दिंडी व रिंगणात सहभाग घेतला. तसेच वनविभागाचे वनपाल टी. वाय. देवरे, जे. ई. धनगर, वनरक्षक गुणवंत देसले, अस्मिता पगार, भामरे या कर्मचाऱ्यांनी दिंडीमध्ये सहभागी होत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी संस्थेतील विविध विभाग प्रमुख डॉ. आशिष गुजराथी,अपूर्वा कुलकर्णी, अरुणभाई संदानशिव, सुनील पाटील, सुनील बारी, डॉ. ईश्वर सौदाणकर, डॉ. संजय चौधरी, उदय ब्रम्हे, अशपाक पिंजारी, डॉ. अनिल माळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर बंधू – भगिनींनी परिश्रम घेतले.
भव्य रांगोळी –
भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी श्री पांडूरंगाची १०० चौरस फुटाची अत्यंत चित्ताकर्षक अशी महारांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.