जळगाव : धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट येथील रहिवासी असलेल्या मयुरेश दीपक पाटील याने वयाच्या 21 व्या वर्षी राष्ट्रीय रक्ष्ाा प्रबोधिनीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आता भारतीय नौदल अकादमीत अधिकारी म्हणून रूजू होणार आहे.
मयुरेश पाटील याने राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी खडकवासला पुणे, येथून नुकतेच नौदल अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. 30 नोहेंबर रोजी राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनीची 145 व्या बॅच ची पासिंग आउट परेड झाली. या परेड ची मानवंदना स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू उपस्थित होत्या. तसेच भारताचे चीप ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण हे देखील या सोहळ्यात उपस्थित होते. खडकवासला पुणे येथील राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी भारतातील एकमेव संस्था असून जी, तिन्ही सेना दलातील अधिकारी घडविण्याचे काम करते. राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी आशिया खंडातील सर्वात मोठी रक्षा संस्था असून, 145 बॅच मधून देश विदेशातील सुमारे 353 कॅडेट्स नी आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सेवेत हजर झालेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव मयुरेश पाटील याचा समावेश असून त्याने जिल्ह्याला नौदलात वर्ग एक अधिकारी होण्याचा मान मिळवून दिला.
मयुरेश धरणगाव तालुक्यातील मौजे वंजारी खपाट चे माजी सरपंच डॉ. दीपक पाटील व सौ शीतल पाटील यांचा मुलगा असून त्याने 10 वी पर्यंतचे शिक्षण जळगाव येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मधून 2018 साली पूर्ण केले व 12 वी पर्यंत चे शिक्षण डिफेन्स करिअर अकॅडेमी छत्रपती संभाजीनगर येथून पूर्ण केले, याच काळात युपीएससी एनडीए 2020 ची परीक्षा उत्तीर्ण केली. डिसेंबर 2020 मध्ये विशाखापट्टण येथे पाच दिवसीय मुलखात यशस्वी रित्या पास होवून 2021 मध्ये च्या 145 व्या बॅच साठी दाखला मिळविला.
पुढील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तो आता केरळ येथील भारतीय नौदल अकादमी (आयएनए) येथे रुजू होणार आहे. मयुरेश चे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
एनडीए सारखी संस्था महाराष्ट्रात असून महाराष्ट्रीय तरुणांचा टक्का या संथेत खूप कमी असून महाराष्ट्रीय तरुणांनी या प्रतिष्ठीत संस्थेत दाखला मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी.
मयुरेश पाटील