Valmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका; परळीत बसवर दगडफेक

Valmik Karad  : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नव्हता. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने याबाबत सातत्याने मागणी केली होती. अखेर आज वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ

वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. सकाळपासूनच समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काही आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने केली. यावेळी एका आंदोलकाला भोवळ आल्याची घटना घडली, तर वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती आंदोलनादरम्यान खालावली.

आज वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या असून कोर्टाने त्याचा ताबा घेण्यासाठी एसआयटीला परवानगी दिली आहे.

वाल्मिक कराडवर मकोका लागल्याच्या बातमीनंतर परळीत तणाव निर्माण झाला आहे. परळी बंदची हाक देत टायर जाळून आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी बसवर दगडफेकही झाली. परिणामी, परळीत शुकशुकाट पसरला असून परिस्थिती चिघळली आहे.

उद्या केज न्यायालयात हजर

वाल्मिक कराडला उद्या केज न्यायालयात हत्येच्या प्रकरणात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.