धुळ्यात जरांगे पाटलांची सभा; 1 पासून मराठा समाजाचे आंदोलन

धुळे : मराठा आरक्षणप्रश्‍नी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांची डिसेंबरमध्ये धुळे शहरात सभा होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षणाबाबत निर्णयाची वाट पाहण्यात आली; परंतु अद्याप ओबीसी आरक्षण मराठा समाजाला जाहीर केलेले नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. राज्यातील प्रत्येक सभेला त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता खान्देशात प्रथमच धुळे शहरात जरांगे पाटलांची सभा होणार आहे.

मराठा समाजाकडून १ डिसेंबरपासून जेल रोडजवळ साखळी उपोषणाला सुरवात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात जरांगे-पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीत आमदार, खासदार, राजकीय पक्षांच्या जिल्हाप्रमुखांऐवजी समाजातील कार्यशील कार्यकत्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सभेसह उपोषणाबाबत जिल्ह्यातील शहरे व तालुक्यातील समाजातील कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधावा, जनजागृती करावी, असा निर्णय बैठकीत झाला. सभेसंदर्भात शहर व तालुकानिहाय सर्व प्रकारच्या समित्या स्थापन होतील. शहरांसह चारही तालुक्यांमध्ये मशाल रॅलीचे नियोजन होईल. सभेची जागा निश्चित करणे, आर्थिक मदत उभारणे, नियोजन आदी विषयांवर चर्चा झाली.

बैठकीला भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, विनोद जगताप, अतुल सोनवणे, निंबा मराठे, अशोक सुडके, सुनील पाटील, हरिश्चंद्र वाघ, राजेंद्र इंगळे, प्रदीप जाधव, देवेंद्र पाटील, जगन ताकटे, वीरेंद्र मोरे, मनोज ढवळे, प्रेमचंद्र अहिरराव, अर्जुन पाटील, डॉ. संजय पाटील, हेमंत भडक, संजय बगदे, प्रा. बी. ए. पाटील, कैलास मराठे, संदीप सूर्यवंशी, अमर फरताडे, श्याम निरगुडे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.