नवी दिल्ली : मणिपूरमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेजारच्या मिझोराममध्ये ही त्यांची झळ पोहचली. त्यामुळे भीतीचं वातावरण असलेल्या मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाचे लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती पाहता मणिपूर सरकारनेही लोकांना हवाई मार्गाने आणण्याची ऑफर दिली आहे.
मिझोराममध्ये राहणाऱ्या मिझो लोकांचे मणिपूरच्या कुकी आणि जोमी जमातींशी खोल जातीय संबंध आहेत. मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाला त्या कुकी आणि जोमी जमातीच्या होत्या. अशा परिस्थितीत, मिझो नॅशनल फ्रंट या माजी दहशतवादी संघटनेची सहयोगी संघटना पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन (पीएएमआरए) ने २१ जुलै रोजी एक निवेदन जारी केले की, ‘मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाच्या लोकांना सुरक्षित राहायचे असल्यास राज्य सोडा’ तसेच या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमधील घटनेमुळे मिझो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत मिझोराम आता मैतई लोकांसाठी सुरक्षित नाही.
मिझोराममध्ये सुमारे २ हजार मैतई समुदायाचे लोक राहतात. ते मुख्यतः राजधानी ऐझॉल आणि त्याच्या आसपासच्या भागात राहतात. PAMRA च्या वक्तव्यानंतर मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायामध्ये भीती पसरली आणि लोक पळून जाऊ लागले आहेत. मात्र, मिझोराम सरकारने लोकांना आश्वासन दिले आहे की, मिझोराममध्ये त्यांना कोणताही धोका नाही आणि मैतईचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. मात्र, असे असूनही मिझोराममधून लोक स्थलांतरित होत आहेत.
हिसांचारानंतर मणिपूरमधील लोकांचे ही पलायन
मणिपूर सरकारनेही एक निवेदन जारी केले आहे की ते मिझोराममध्ये राहणाऱ्या मैतई समुदायाच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि जर गरज पडलीच तर राज्य सरकार त्यांना आणण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवू शकते. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापासून कुकी आणि जोमी जमातीच्या १२ हजारांहून अधिक लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे.