हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला मोठा इशारा

पुणे : एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यावर पुढील किमान ५ दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत. याचा फटका विदर्भाला मोठ्या प्रमाणात बसेल. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रखरखत्या उन्हापासून किंचितसा दिलासा मिळाला असला तरी उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. आता एप्रिल महिना संपत आला आहे. मे हिटची चाहुल लागली आहे. असे असले तरी या आठवड्यात वातावरणातील चढउतार तीव्रतेने पहायला मिळणार आहेत.

या नव्या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बर्‍याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार असून, आता इतक्यात तरी अवकाळी काढता पाय घेत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भा व्यतिरिक्त सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसू शकतो. २४ ते २६ एप्रिलदरम्यान पावसाचं प्रमाण अधिक असेल, तर आठवड्याच्या मध्यापासून ते कमी होण्यास सुरुवात होईल.