चाळीसगाव : शहरात तंबाखू कारखान्यात कार्यरत तिघा परप्रांतीय मजुरांचा अंगावर भिंत कोसळल्याने दबले जावून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाली खोदाई करण्याचे काम सुरू असताना घडली. विनीत कुमार (35), मोहम्मद अली फकीर अली (40), लतीब रहिम (36, तिघे रा.उत्तरप्रदेश) अशी मयतांची नावे आहेत.
भिंत कोसळल्याने मजुरांचा मृत्यू
चाळीसगाव शहरातील औरंगाबाद रस्त्यावर सूर्य छाप पटेल हा तंबाखू तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गेल्या काही वर्षापासून उत्तर प्रदेशातील मजूर कार्यरत आहेत. रविवार, 19 रोजी सायंकाळी सहा वाजता सूर्य छाप पटेल तंबाखू कारखानाच्या एच.एच.पटेल कंपनीत मजूर नाली खोदाईचे काम करतीत असताना संरक्षण भिंत कोसळून ती मजुरांच्या अंगावर पडल्याने विनीत कुमार, मोहम्मद अली फकीर अली, लतीब रहिम यांचा मृत्यू झाला तर अन्य एक मजूर जखमी झाला. जखमी मजुरावर चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहा.निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.
मजुरांवर कोसळले संकट
पोटाची खळगी भरण्यासाठी चाळीसगावात आलेल्या परप्रांतीय मजुरांवर या घटनेमुळे संकट कोसळले आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या तिघांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती कळवण्यात आली असून घटनेनंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रात्री हलवण्यात आले.