पुणे : येथील हिंजवडी फेज १ रोडवर एका धावत्या मिनी बसल्या आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. सुभाष भोसले (वय 42), शंकर शिंदे ( वय 60), गुरुदास लोकरे ( वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40) असे मृत चौघांचे नाव आहे. दरम्यान, सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटत होता मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
व्योम ग्राफिक्स या आयटी कंपनीचे १२ कर्मचारी बसमधून जात होते. दरम्यान, हिंजवडी फेज १ रोडवर या धावत्या मिनी बसला आग लागली. यात होरपळून चौघांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटत होता. मात्र, मिनी बस चालकाच्या नाटकी वागणुकीवरुन पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी हिंजवडी भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, त्यांना चालक पायाखाली आग लावताना दिसून आला.
पोलिसांनी या संशयाच्या आधारे चालक जनार्दन हंबर्डीकरची चौकशी केली असता त्याने या धक्कादायक हत्याकांडचा उलगडा केला. त्याने पोलिसांना सांगितले की, कंपनीने दिवाळीचा पगार कापून दिल्यामुळे त्याचा कंपनीवर रोष होता.
तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून त्याला अत्यंत हिन वागणूक दिली जायची. दोन दिवसांपूर्वी तो जेवण करत असताना त्याला डब्यातील चपातीही खाऊ दिली नाही. या रागाच्या भरातून त्याने कर्मचारी आणि कंपनीला धडा शिकवण्यासाठी थेट गाडी जाळण्याचा कट रचला.