‘गुलाबराव देवकर हा नकली, संजय राऊत…’, नेमकं काय म्हणाले मंत्री पाटील ?

जळगाव । माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी गंभीर आरोप करत जोरदार टीका केलीय. तसेच संजय राऊतांच्या घराची रेकी करण्यात आल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी राऊतांवरच आरोप केले आहेत.

गुलाबराव देवकरांवर निशाणा
मंत्री पाटील यांनी दावा केला की, अजित पवार गटामध्ये प्रवेश न मिळाल्याने देवकर भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्री पाटील यांच्या मते, देवकर यांनी पक्षांतराची प्रक्रिया निवडणुकीच्या लगेच सुरू केली असून, त्यांच्या या कृतीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मंत्री पाटील पुढे म्हणाले की, मतदानासाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचार न करता देवकर यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तसेच, देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मंत्री पाटील यांनी जाहीर इशारा दिला की, देवकर हे कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांचा भ्रष्टाचार उघड केला जाईल.

संजय राऊत काय मोठा डॉन वाया चालला का ?
मंत्री गुलाबराव पाटील यांनी, “संजय राऊत काय मोठा डॉन आहे का ? यांना कोण मारेल?” तसेच, त्यांनी असा आरोप केला की, “रेकी करण्यासाठी माणसे संजय राऊत यांनीच पाठवली असतील.”

यावेळी त्यांनी हे देखील म्हटले की, “संजय राऊत आमच्या भरोशावर खासदार झाले आहेत, म्हणूनच दोन पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी आहेत. मात्र, खासदारकी संपल्यानंतर त्यांच्यासोबत एकही पोलीस दिसणार नाही.”

दरम्यान, आता मंत्री पाटील यांच्या या विधानांवर संजय राऊत आणि त्यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खातेवाटपनंतर मंत्री पाटीलांची पहिली प्रतिक्रिया

मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा खातं मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या प्रलंबित कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे संथ गतीने सुरू आहेत. अशा प्रलंबित कामांना पुन्हा कशा सुरू करता येईल, यासाठी ते प्रयत्नशील राहतील. तसेच, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्वप्नातील प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.