---Advertisement---
जळगाव : बहिणीच्या सासरी राहायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीशी २१ वर्षाच्या तरुणाने प्रेमसंबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्षे ८ महिने वय असलेली पिडीता आपल्या बहिणीच्या सासरी राहायला गेली असता तिची ओळख अजय सुकलाल मोरे (२१) याच्याशी झाली होती. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध झाले.
पीडितेचे आई-वडील, भाऊ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अजय मोरे हा आपल्या गावातून या पिडितेच्या गावी येत होता व तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने विरोध केला असता तो तिच्या आईवडिलांना सांगायची धमकी देत होता. त्यामुळे पीडिता त्याला विरोध करत नव्हती.
कालांतराने पीडिता गर्भवती राहिली. बहिणीने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सर्व प्रकरण उघडकीस आले. वैद्यकीय चाचणी केली असता ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अजय मोरे याला अटक करण्यात आली आहे.