---Advertisement---
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याक समुदायाविरोधात वाढत चाललेला हिंसाचार व अत्याचारावर एका प्रमुख मानवाधिकार संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली. पाकमधील धार्मिक असहिष्णुतेमुळे हिंदू, बौद्ध, खिश्चन, अहमदिया, शीख व इतर अल्पसंख्याकांना अत्याचार, उपेक्षा आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याची चिंताजनक स्थिती असल्याचा दावा या संघटनेने केला आहे.
पाकमध्ये हिंदू अल्पसंख्याक समुदायातील लोकांना हिंसाचार व सक्तीच्या धर्मांतरणाला सामोरे जावे लागत असल्याची भीषण स्थिती आहे. अल्पसंख्याकांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ (व्हीओपीएम) या मानवाधिकर संघटनेने या स्थितीवर प्रकाश टाकत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पाकमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची तीव्रता अधोरेखित करण्यासाठी मानवाधिकार संघटनेने अमेरिका स्थित एका संघटनेच्या ताज्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. धार्मिक स्वातंत्र्याची घटनात्मक हमी असतानादेखील पाकमध्ये अल्पसंख्याक समुदाय व लहान लहान मुलीदेखील सातत्याने असुरक्षित वातावरणात वावरत आहेत.
अल्पसंख्याक समुदायाला न्याय मिळण्याची खूप कमी आशा आहे. वादग्रस्त ईशनिंदा कायद्यामुळे अल्पसंख्याकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून अल्पसंख्याकांना धमकी देणे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे काम केले जात आहे. पाकमध्ये अल्पसंख्याकांवरील अत्याचार हा फक्त राजकीय किंवा कायदेशीर मुद्दा नाही तर हे एक मानवीय संकट असल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.