---Advertisement---
Archana Tiwari : भोपाळमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी अखेर सापडली आहे. पोलिसांनी तिला भोपाळला आणले असून, चौकशी करून तिला कुटुंबाकडे सोपवलं आहे. दरम्यान, अर्चनाने कुटुंबीयांना मित्रासोबत काठमांडूला जात असलयाचे कळविले होते, मात्र तिच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट पोलिसांपासून लपवून ठेवली आणि मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले.
पोलीस चौकशीदरम्यान अर्चनाने खुलासा केला आहे की तिचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते. मात्र, तिला तिच्या मित्राशी लग्न करायचे होते. शिवाय करियरमुळे तिला काही वर्षे लग्न करायचे नव्हते. मात्र, कुटुंबीयांनी तिला रक्षाबंधनाच्या दिवशी घरी बोलावले होते, जिथे तिच्या बघण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे तिला वाटले की कुटुंबीय लग्नासाठी खूप दबाव आणतील, म्हणून तिने हा प्लॅन केला.
अर्चनाचा मित्र इंदूरमध्ये राहतो, ती त्याच्याशी लग्न करू इच्छित होती. याबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती होती, म्हणून ते तिचे लग्न त्यांच्या समाजात करू इच्छित होते. त्यामुळे अर्चना भोपाळ रेल्वे स्टेशन वरून मित्रसोबत इंदूरमार्गे हैदराबादला निघून गेली. हैदराबादमध्ये २-३ दिवस राहिल्यानंतर, तिने मीडियामध्ये बातम्या पाहिल्या आणि ११ ऑगस्ट रोजी, ती हैदराबादहून थेट दिल्लीला पोहोचली. त्यानंतर नेपाळमधील धनगढीला टॅक्सीने गेली. येथून ती काठमांडूलाही पोहोचली.
कटनी जिल्ह्यातील रहिवासी
अर्चना ही मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि ती इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश पदाची तयारी करत आहे. २९ वर्षीय अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनच्या कोच क्रमांक बी-३ मध्ये बसली होती. रक्षाबंधनाच्या सुट्टीसाठी ती तिच्या घरी जात होती. तिची ट्रेन भोपाळला पोहोचताच, अर्चना अचानक बेपत्ता झाली. तिची बॅगही तिच्या सीटवर आढळली, पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत याबात तक्रार केली. यात पोलिस वेगवेगळे अँगल शोधण्याचा प्रयत्न करत राहिले. अर्चना बेपत्ता झालेल्या भोपाळ स्टेशनवरून शेकडो सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात होते. ८ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी कटनी जीआरपीकडे तक्रार केली. ९ ऑगस्ट रोजी राणी कमलापती जीआरपीने तपास सुरू केला.