धुळे : धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी मंगळवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास येथील बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या बेकायदेशीर गोतस्करीच्या पर्दाफाश केला. शेकडो गोवंशांचे प्राण वाचविण्यात यश आले असून, हा बेकायदेशीर गोतस्करीचा धंदा करणाऱ्यांवर व यामागील सूत्रधारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आमदार अग्रवाल यांनी आझादनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, गोतस्करी उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी सुमारे ११ गायी, ५६ बैल, ४९ गोऱ्हे, ९ वासरू, २ पारडू आदी जनावरे ताब्यात घेत ती चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत पाठविली. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून, अद्याप कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार जणू बेकायदेशीर गोवंशांची खरेदी- विक्रीचे केंद्र झाल्याची तक्रार श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलनचे संस्थापक संजय शर्मा व प्राणीन फाउंडेशनच्या संस्थापक नेहा पटेल यांच्या नेतृत्वात प्रणील मंडवलिक, भुराभाऊ माळी व त्यांच्या गोरक्षकांच्या टीमने आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली. विशेष म्हणजे येथील कृषी उत्पन्न बाजर समितीत खरेदी- विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या प्रत्येक जनावराच्या कानाला बिल्ला (ईअर टॅग) असणे बंधनकारक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असताना, तसेच गोवंश संरक्षण व वाहतुकीचे विविध कायदे असतानाही येथील बाजार समिती प्रशासनाला जनावरांचा बाजार भरविताना या कायद्यांचा विसर पडला होता. हे कायदे सर्रास पायदळी तुडवत राजरोसपणे विना ईअर टॅग असलेल्या जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व खरेदी- विक्री सुरू होती. यातून छुप्या मार्गाने ही जनावरे सर्रासपणे कत्तलीसाठी पाठविण्यात येत होती.
१२७ जनावरे नवकार गोशाळेत
मंगळवारी रात्री अशीच ईअर टॅग नसलेली शेकडो जनावरे बाजार समितीत खरेदी-विक्रीसाठी दाखल झाल्याची व ती तेथून अवैध कत्तलीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी मिळाली. त्यानुसार रात्री साडेअकराच्या सुमारा आमदार अग्रवाल यांच्यासह भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, भिकन वराडे, धीरज परदेशी, प्रणील मंडलिक, भुराभाऊ माळी यांच्यासह गोरक्षक मोठ्या संख्येने बाजार समितीत दाखल झाले. त्यांनी तेथे ईअर टॅग नसलेली सुमारे १२७ जनावरे खरेदी-विक्रीसाठी आणली असल्याचे पाहिले.
याबाबत आमदार अग्रवाल यांनी तातडीने पोलिस प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार जिल्हा पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार, पश्चिम देवपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे यांच्यासह आझादनगर पोलिस ठाण्याच्या शोधपथकातील कर्मचारी दाखल झाले. त्यांनी सर्व जनावरे ताब्यात घेत ती चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत पाठविली.
आमदार अग्रवाल यांचे कठोर कारवाईचे आदेश
आमदार अग्रवाल यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. ते म्हणाले, की धुळे कृषी उत्पन्न बाजर समितीत खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक जनावराच्या कानाला बिल्ला असणे बंधनकारक आहे. त्यासाठी पशुपालक / व्यापाऱ्यांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय केंद्रातून जनावरांच्या कानाला १२ अंकी ईअर टॅग मारून त्याची ऑनलाईन नोंदणी करावी, असा जिल्हाधिकाऱ्यांचा २५ एप्रिल २०२४ च्या आदेश आहे. असे असताना धुळे बाजार समितीत नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सुरू आहे. बाजार समिती प्रशासनानेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जनावरांच्या बेकायदेशीर खरेदी- विक्रीला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे बाजार समितीच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही तसेच यातील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही आमदार अग्रवाल यांनी केली.