MLA disqualification: केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. आम्हाला आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के तर लोकसभेत ७५ टक्के बहुमत आहे. या बहुमतच्या आधारेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आम्ही अधिकृत पक्ष आहोत, धनुष्यबाण हे चिन्हही आमच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी आमच्याच बाजूने निकाल दिला पाहिजे.
आमचं सरकार हे घटनाबाह्य नाही तर ठाकरे गट हा घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल त्यांनी बारकाईने वाचला पाहिजे. त्यावेळी माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार अस्तित्त्वात नव्हते. त्यामुळे राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय योग्य होता. त्यावेळी आमच्याकडे ५० आमदार आणि भाजपचे ११० आमदार असे बहुमत होते. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचावा, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.
ठाकरे गटाला त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते पडणार असे वारंवार सांगितले जात आहे. मुख्यमंत्री बदलणार अशीही चर्चा होती. पण उलट सरकार आणखी मजबूत झाले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
विधानसभा अध्यक्ष आणि माझ्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. पण मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा करतो, हेच दुर्दैव आहे. मला आरोप बोलायला हे काही फौजदारी प्रकरण आहे का? हे नागरी प्रकरण आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.