MLA disqualification case: निकालानंतर पुढे काय? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले….

MLA disqualification case: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आजचा निकाल लोकशाहीमध्ये मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. या निकालानं ज्यांचं समाधान झालं नसेल, त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येईल, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या निकालाचे वाचन करणार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ आज संपेल, असं अनेकांना वाटत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम?
आजचा निकाल म्हणजे लोकशाहीमध्ये मार्गदर्शक ठरेल, असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम  यांनी दिली आहे. शिवसेनेच्या  दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेवर आज निकाल येणार आहे. त्यामुळं कही खुशी, कही गम असा हा निकाल असेल, असंही ते म्हणाले.

देशाच्या इतिहासातील ही पहिली घटना असेल; कारण न्यायालयानं जी काही निरीक्षणं नोंदवली त्यातून अध्यक्ष काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आज अध्यक्षांचीच कसोटी म्हणावी लागेल. कही खुशी कही गम असा निकाल असेल. मात्र निकालाने ज्यांचं समाधान झालं नसेल त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाता येईल, असं निकम यांनी सांगितलं.

आताचे अध्यक्ष कायद्याचे अभ्यासक – झिरवळ
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर  नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या निर्णयावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. आताचे विधानसभा अध्यक्ष हे कायद्याचे अभ्यासक आहेत. ते योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास झिरवळ यांनी व्यक्त केला आहे. अध्यक्ष अभ्यास करूनच निर्णय घेतील असं सांगतानाच, जो निर्णय होईल, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक निर्णय असणार आहे, असं मानलं जात आहे. अपात्र कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीयदृष्ट्या हा सर्वात महत्वाचा निकाल असल्यानं निर्णय लागल्यानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये; तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईतील विविध भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंत्रालय परिसरात मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, राखीव दले अशी विविध पथके तैनात आहेत.