MLA disqualification: एकनाथ शिंदेंचं रोखठोक भाष्य, राहुल नार्वेकरांसोबतच्या भेटीचं सांगितलं कारण

MLA disqualification:  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मला रात्रीच्या अंधारात लपुनछपून भेटायला आले नव्हते. ते दिवसाच्या उजेडात त्यांच्या अधिकृत वाहनाने वर्षा बंगल्यावर आले होते. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामासंदर्भात चर्चा झाली, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल बुधवारी दुपारी दिला जाणार आहे. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी या भेटीवर टीका करत आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले

विधानसभा अध्यक्ष दुपारी चार वाजता आमदार अपात्रतेसंदर्भात MLA disqualification निकाल देणार आहेत. त्यानंतरच मी आमची भूमिका मांडेन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांसोबतच्या भेटीचे समर्थन केले. काही लोक आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचा आरोप करत आहेत.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या केबिनमध्ये जेवत होते. तेव्हा आम्ही आक्षेप घेतला का? विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यांच्या अधिकृत वाहनातून मला भेटायला आले होते. ते रात्रीच्या अंधारात लपूनछपून नव्हे तर दिवसाउजेडी आले होते. त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात ही भेट होती.

ही भेट झाली तेव्हा सरकारी अधिकारीही सोबत होते. आमच्यात लपूनछपून कोणतीही बैठक झाली नाही. आम्ही अंधारात बैठका घेणाऱ्यातील नाही. त्यामुळे या भेटीवरुन आरोप करणाऱ्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. जेव्हा एखादा निकाल यांच्या बाजूने लागतो, तेव्हा ती संस्था चांगली ठरते. निकाल विरोधात गेल्यास संबंधित संस्थेवर टीका केली जाते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.