मोठी बातमी ! जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर; उद्या होणार पक्षप्रवेश

धुळे : शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक कामराज निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कामराज निकम यांचा उद्या पुणे येथे पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे कामराज निकम यांनी जयकुमार रावल यांच्या अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शिंदखेड्यात एकच खळबळ उडाली आहे.

कामराज निकम हे गेल्या 20 वर्षांपासून जयकुमार रावल यांचे कट्टर समर्थक आहेत. पण जयकुमार रावल यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कामराज निकम हे आता शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा परिषदेवर भाजपची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर कामराज निकम यांच्या पत्नीकडे उपाध्यक्ष पदाची धुरा होती. कामराज निकम यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. कामराज यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे जाण्याच्या निर्णय घेतल्याने शिंदखेडा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कामराज निकम यांचे जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप
20 वर्षांपासून जयकुमार रावल घोषणा करत आहेत. पण एक टक्कादेखील सिंचनाचं काम या तालुक्यात होऊ शकलं नाही. तालुक्यातील 100 गावांना प्यायला पाणी नाही. सलग 20 वर्ष तालुक्याचे नेतृत्व करून देखील 100 गावांना प्यायला पाणी नाही. हे जयकुमार रावल यांचं अपयश आहे, असा आरोप कामराज निकम यांच्याकडून आमदार जयकुमार रावल यांच्यावर करण्यात आला आहे.