आमदार पाटलांची घोषणा अन् मित्र पक्षांना धडकी, कार्यकर्त्यांना केलं आवाहन

---Advertisement---

 

MLA Kishore Patil : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. अशात पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी नवी रणनीती आखली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी ०१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्या’त सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

आमदार किशोर पाटील म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनी दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. मात्र, यावर्षीचा माझा वाढदिवस हा माझ्यासाठी खास आणि आगळावेगळा ठरणार आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मी महाराष्ट्रातील पहिला आमदार आहे ज्याने शिवसेना या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केल्यानंतर माझा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्याचे औचित्य साधून मी ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला आहे.”

हा निर्धार मेळावा एक नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील लोढाया जीन मैदानावर होणार असून, या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, “जेव्हा मी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या सोबत होते. मात्र, हा निर्णय आता माझा एकट्याचा नाही, तो आपल्या सर्वांच्या निर्धारातून दृढ व्हायला हवा. शिवसेनेचा भगवा झेंडा नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर फडकवण्याचा आमचा निर्धार आहे. ०१ नोव्हेंबरचा मेळावा हा असा व्हावा की, संपूर्ण जिल्ह्याने पाहावे आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा सर्वत्र फडकणार आहे. हा मेळावा शिवसैनिकांच्या एकतेचा आणि निर्धाराचा पुरावा ठरणार आहे.” या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,स्वीय सहायक राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---