---Advertisement---
पाचोरा : काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी सकाळपासून पाचोरा शहरातील विविध भागांत पाहणी करत नागरिकांसोबत संवाद साधत धीर दिला. तसेच नुकसानीचे पंचानामे करण्याच्या सूचना देखील प्रशासनास आमदार पाटील यांनी दिल्या आहेत.
डोंगरमाथ्यात जोरदार पाऊस झाल्याने हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरातील कृष्णापुरी, श्रीराम मंदिरातील परिसर, शिवाजीनगर, कोंडवाडा गल्ली, आठवडे बाजार, मुल्ला वाडा, मच्छिबाजार नागसेन नगर, बहिरम नगर तसेच जनता वसाहत या परिसरात पाहणी केली.
हिवारा नदीत आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने आमदार किशोर पाटील यांनी नागरिकांना धीर देत सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केले. तुमची जवळच्या शाळेत सोय करण्यात आली असून तुम्ही त्याठिकाणी जावं आणि पुढील कार्यवाही साठी प्रशासनास सांगितले असल्याचे आ.किशोर पाटील यांनी सांगितले. यावेळी युवा नेते सुमित किशोर पाटील, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.