MLA Mangesh Chavan : विकासकामांना निधी  कमी पडून देणार नाही  

MLA Mangesh Chavan : आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो. पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटीमधून जो जन्माला येतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आम्ही म्हणजे राजे नसून जनतेचे सेवक आहोत. शासन आम्हाला पगार व सुविधा देते, त्या तुमच्या सेवेसाठी. म्हणून चाळीसगाव तालुक्याचा आमदार झाल्याच्या पहिल्या मिनिटापासून मी चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. मी तुमच्या सेवेसाठी कामावर असलेला पगारी माणूस आहे. रस्ते, गटार, वाटर आणि मीटर या विकास कामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती जनतेला मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

मांदुर्णे गावातील 2 कोटी 65 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात आ.चव्हाण बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून 25 लाखांचा निधी देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रसंगी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील 161 हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटप देखील करण्यात आले.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपुजन
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते मांदुर्णे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत 86 लाखांची पाणी पुरवठा योजना, पिलखोड ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (74.39 लक्ष), साकुर फाटा ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (30 लक्ष), मुलभूत सुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (25 लक्ष) व सभामंडप बांधकाम करणे (20 लक्ष), जि प शाळा खोली बांधकाम करणे (12.15 लक्ष) शिवाजी पाटील ते छगन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), सायगाव व मांदुर्णे नदीतून जाणाऱ्या नवीन कृषी वीज वाहिनीचे काम करणे (8 लक्ष) आदी कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले. तसेच मांदुर्णे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाना 73 रेशनकार्ड व 49 जातीचे प्रमाणपत्र, अलवाडी येथील 25 कुटुंबाना  रेशनकार्ड, सायगाव येथील 14 कुटुंबाना जात प्रमाणपत्र, भवाळी येथील 06 कुटुंबाना जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.