MLA Nilesh Lanka : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणारआहेत
निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, महायुतीत ही जागा भाजपच्या वाटेला जात असल्याने निलेश लंके नाराज झाले. त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतलाय.
अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा दमदार आमदार-फिक्स खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठी ताकद आहे.
शरद पवार गटाने या जागेवर उमेदवार देण्यास तयारी दर्शवली आहे. निलेश लंके पुन्हा पक्षात परतल्याने अहमदनगरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.