मनोज माळी
तळोदा । गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती संदर्भात आंदोलन सुरु आहे. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज आदिवासी आमदारांनी थेट मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उड्या घेत अनोखे आंदोलन केले. त्यानंतर पेसा उमेदवारांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाविरोधात सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेश पाडवी यांनी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत, राज्य सरकारच्या उदासीन वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले आमदार राजेश पाडवी ?
पेसाभरती संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना झिरवळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन-तीन वेळा भेटण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची भेट होत नाही. आज अक्षरशः झिरवळ साहेब यांना मंत्रालयामध्ये पहिल्या माळ्यावर उडी मारावी लागली तेव्हा कुठेतरी शिंदे साहेबांची भेट झाली. परंतु, त्यांनी सांगितलं की पेसा उमेदवारांना मानधन तत्त्वावर घेऊ. हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमची हक्काची पैसाभरती पाहिजे, असे म्हणत आमदार पाडवी यांनी कंत्राटी भरतीला विरोध दर्शवत शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.
17 संवर्ग पैसाभरती आमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. संख्या पद साडेबारा हजार आहे ते देखील भरले गेले पाहिजे. सर्वच कंत्राटी पद्धतीने चालत राहील तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय होईल ? कंत्राटी भरती ही फक्त 11 महिन्याची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं काय होईल ? त्यांना भविष्यामध्ये कुठेही नोकरी मिळणार नाही. मुलं रस्त्यावर येतील. मला ती मुलं फोन करून सांगताय. अक्षय दुःख वाटतंय की आम्ही सत्तेत असून त्यांना न्याय मिळवून देता येत नाहीय. याची खेद वाटतेय. आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, असेही आमदार राजेश पाडवी म्हणाले.
गेल्या दोन वर्षांपासून 17 संवर्ग पेसाभरती बंद आहे. सुप्रीम कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेले नाही. 17 संवर्ग पैसाभरती शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन जाऊन मुलांना न्याय द्यावा, त्यांना त्या ठिकाणी नेमणूक करावी, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे.