मोठी बातमी! आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

बुलढाणा ।  चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात त्या आज दुपारी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. दरम्यान,  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच भाजप आमदारालाही अशा स्वरूपाची धमकी मिळणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

राज्यातील काही आमदारांना सातत्याने धमक्या मिळत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आमदारांची सुरक्षा कमी केल्यामुळे असे प्रकार वाढू लागलेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप कार्यकर्ते या घटनेने आक्रमक झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

श्वेता महाले यांची ही विधानसभेतील दुसरी टर्म आहे. जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या महाले यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांचे, त्या ठाम भूमिका घेऊन आवाज उठवत असतात. त्यांच्या आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या जनतेच्या विशेषतः महिला वर्गाच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत.

महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधित्व केले असून, महिला बालकल्याण सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सभापतीपदाच्या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विविध विकासकामे मार्गी लावली. मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर त्या थेट विधानसभेच्या मैदानात उतरल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या.

चिखलीत 15 वर्षांनंतर भाजपचा विजय

बुलडाण्यातील चिखली मतदारसंघात तब्बल 15 वर्षांपासून भाजपला विजय मिळविता आला नव्हता. 2019च्या निवडणुकीत भाजपने महाले यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राहुल बोंद्रे उभे होते, जे या मतदारसंघाचे दोन टर्म आमदार होते. अत्यंत चुरशीच्या या लढतीत महाले यांनी 6,851 मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपच्या वनवासाचा शेवट केला. त्या वेळी त्यांना 92,205 मते मिळाली, तर बोंद्रे यांना 85,433 मते मिळाली.

महाले यांचे पती विद्याधर महाले प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आहेत. त्यांचे सासर-माहेर दोन्ही राजकीय पार्श्वभूमी असलेले कुटुंब आहे. भाजपचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 2014मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, 2019मध्ये मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले.

धमकीमागचे नेमके कारण काय?

श्वेता महाले यांना मिळालेल्या धमकीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल, अशी शक्यता आहे. आमदारांना अशा प्रकारे धमक्या मिळणे हा लोकशाहीसाठी घातक संकेत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.