---Advertisement---
जळगाव : येथील एमआयडीसी परिसरातील अनेक खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची (PF) नियमित कपात केली जाते. परंतु, ही कपात केलेली रक्कम संबंधित कंपन्यांकडून भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जात नसल्याचा प्रकार घडत आहे. अशा सर्व भविष्य निर्वाह निधी जळगाव कार्यलयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भविष्य निर्वाह निधी अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव एमआयडीसी भागातील काही कंपन्या त्यांच्याकडील कामगारांच्या पगारातून दरमहा नियमितपणे भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) म्हणून रक्कम कपात करीत आहेत. कामगारांच्या कष्टाने मिळवलेल्या पगारातील रक्कम कपात करूनही संबंधित निधी कार्यालयात जमा केला गेला नाही. ही बाब गंभीर असून कामगारांवर अन्यायकारक आहे. भविष्य निर्वाह निधी हा कामगारांच्या भविष्याची सुरक्षितता, निवृत्ती नंतरचा आधार व आपत्कालीन परिस्थितीतील हक्काची मदत आहे. त्या निधीची चोरी अथवा अडवणूक करणे हे कामगारांच्या जीवनाशी खेळ करण्यासारखे असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
अशा आहेत मागण्या
आपल्या कार्यक्षेत्रातील अशा सर्व खाजगी कंपन्यांची तपासणी करून, ज्यांनी कामगारांची कपात केलेली भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप जमा केलेली नाही, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी. संबंधित कंपन्यांना सदर रक्कम तातडीने भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच, भविष्यात कोणतीही कंपनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कम थकवणार नाही, याची कठोर अंमलबजावणी करावी. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कामगारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरून आपले हक्क बजावेल. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, रज्जाक सय्यद, अविनाश पाटील, दीपक राठोड, साजन पाटील, जितेंद्र पाटील, भूषण ठाकरे, विकास पात्रे, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे उपस्थित होते