---Advertisement---
धुळे : बस स्थानक परिसरात गर्दी हेरून प्रवाशांच्या खिश्यातुन मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ३० मोबाइल हस्तगत केले असून, याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका संशयित आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ३० मोबाइल हस्तगत केले आहेत. दोंडाईचा बसस्थानकातून कमलेश ज्ञानेश्वर आडगाळे यांचा मोबाइल चोरीला गेला होता. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, शिरपूर पोलिस उपविभागीय अधिकारी संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलिस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांनी संशयित आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या बॅगेत विविध कंपन्यांचे ३० मोबाइल सापडले. जप्त करण्यात आलेल्या या मोबाइलची किंमत ३ लाख रुपये आहे. याप्रकरणी शंकर बन्सी ठाकरे (रा. दोंडाईचा टेक भिलाटी) याच्या विरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.