---Advertisement---
जळगाव : सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून, विविध ठिकणीहून मोबाईल चोरून ते खड्ड्यात पुरून ठेवणाऱ्या एका चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच्याकडून चार लाखांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.
नोरसिंह गुजरिया (२३, रा. इंदूर, मध्यप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलेदेखील सापडली. पोलिसांनी खड्यातून ३३ मोबाईल जप्त केले असून, हे मोबाईल ज्यांचे असतील त्यांना परत केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
---Advertisement---
चोरीच्या मोबाईलचा शोध लावण्याविषयी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे पथक शनिवारी आठवडी बाजारात गस्त घालत असताना तरुण गुजरिया हा संशयितरीत्या फिरताना आढळला. त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलेदेखील होती.
गुजरिया याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार मोबाईल सापडले. बाजारात सापडलेला संशयित स्वामीनारायण मंदिराजवळ एका शेतात झोपडी टाकून राहतो. या झोपडीजवळच जमिनीत खड्डा करून चोरीचे मोबाईल ठेवल्याची कबुली त्याने दिली.
३३ मोबाईल जप्त
पोलिसांनी जप्त केलेले ३३ मोबाईल हे ज्यांचे असतील त्यांना परत केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.