नरेंद्र मोदींनी गुजरातच्या यशाचे श्रेय दिलं जळगावच्या सुपुत्राला; वाचा सविस्तर

तरुण भारत लाईव्ह । १४ डिसेंबर २०२२ । भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत आज बुधवारी गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानिमित्त जल्लोष साजरा करण्यात आला. या बैठकीत भाजपच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एका आवाजात अभिनंदन करत त्यांना गुजरात विजयाचे श्रेय दिले. मात्र, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या यशाचे श्रेय जळगावच्या एका सुपुत्राला दिलं. त्यांचं नाव म्हणजे सी आर पाटील.

गुजरात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत सी आर पाटील यांचे अभिनंदन व कौतूक केलं होते. मोदींनी आजही सी आर पाटील यांचे कौतूक केले आहे. सी आर पाटील यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ते कधीच व्यासपीठावर फोटो काढत नाहीत. ते संघटनेसाठी काम करत असतात. या विजयाचे श्रेय मला देऊ नका. या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली. त्यांच्या या मेहनतीमुळेच पक्षाला विधानसभा निवडणुकीत विक्रमी जागा जिंकता आल्या. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १५६ जागा मिळाल्या, हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा आहे. गुजरातच्या स्थापनेनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे.

कोण आहेत सी आर पाटील ?
मोदींचे निकटवर्तीय म्हणून खासदार सी आर पाटील यांची ओळख आहे. गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका पिंप्री अकाराऊत या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जळगाव शहारात डी मार्ट जवळ मोठा बंगला आहे. जवळपास गेल्या तीस वर्षांपासून ते नवसारीमध्ये कार्यरत आहेत. पाटील २००९ पासून भाजपच्या तिकीटावर सुरत-नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी मतदारसंघाच्या विकासाचा कार्यभार सी. आर. पाटील यांच्यावर सोपवण्यात आला होता.