पीओके बाबत मोदी सरकारच्या वजनदार मंत्र्याचं मोठं विधान

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत आहेत. पीओकेमधील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, गगनाला भिडणारी महागाई आणि उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारच्या अजेंड्यावर पीओकेचा प्रश्न आधीपासूनच आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह (निवृत्त) यांनी यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. राजस्थानमधील दौसा येथे पत्रकार परिषदेत भाजप खासदार आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह यांना विचारण्यात आले की, पीओकेचे शिया मुस्लिम भारतासोबतची सीमा उघडण्याबाबत बोलत आहेत का? यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर व्हीके सिंह म्हणाले, “पीओके आपोआप भारतात विलीन होईल. तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.”

व्हीके सिंह यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतात ज्या प्रकारे G20 चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तसेच, G20 सारखा कार्यक्रम यापूर्वी आयोजित केला गेला नव्हता आणि कोणत्याही देशाने विचारही केला नसेल की, भारत अशी परिषद आयोजित करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आह, असेही व्हीके सिंह म्हणाले.