नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत आटा’ या नावाने एक ब्रँड देशभरात लॉन्च केला आहे. या गव्हाच्या पिठाची २७.५० रुपये किलो दराने विक्री सुरू केली आहे. नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील ८०० मोबाईल व्हॅन आणि २,००० हून अधिक दुकानांमधून ‘भारत आटा’ची विक्री केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या ३६-७० रुपये प्रति किलोच्या बाजारभावापेक्षा गुणवत्तेवर आणि स्थानानुसार अनुदानित दर कमी आहे. फेब्रुवारीमध्ये, सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत काही दुकानांमध्ये या सहकारी संस्थांमार्फत १८,००० टन ‘भारत आटा’ची २९.५० रुपये प्रति किलो दराने प्रायोगिक विक्री केली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘भारत आटा’च्या १०० मोबाईल व्हॅनला हिरवा कंदील दाखवून केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल म्हणाले की, ‘आम्ही पिठावर अनेक चाचण्या घेतल्या आणि त्यात यश आल्याने आम्ही ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवली आहे. २७.५० रुपये प्रति किलो दराने देशात हे पिठ सर्वत्र उपलब्ध आहे.