२००२ पासून भारतीय डावे आणि पुरोगामी कमालीचे गोधळलेले आहेत. भारतीय राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी लोकांमध्ये डाव्यांच्या इकोसिस्टमचा मोठा धाक होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. २००४ च्या लोकसभेत भाजपचा अनपेक्षित पराभव झाला तो डाव्यांना आणि पुरोगाम्यांना आपल्या कर्तृत्वाचा विजय वाटला. प्रत्यक्षात त्या पराभवाची कारणं वेगळी होती. सोनिया सरकार आल्यानंतर डाव्यांनी दिल्लीत आपलं मोठं बस्तान बसवून सच्चर आयोग्य, समान संधी आयोग आणि कम्युनल व्हायोलन्स बिल आणून हिंदूंना विभाजित आणि प्रताडित करण्याचे संवैधानिक रस्ते तयार केले.
मोदींचा चुपचाप उदय..
२००४ ला सोनिया सरकार येण्यापूर्वी कच्छ भूकंप आणि गोध्रा जाळीत कांड यानंतर मोदी मुख्यमंत्री झाले. वाजपेयी सरकारला हरवण्यात फक्त आपलीच एकमेव भूमिका होती या भ्रमात डावे आणि पुरोगामी “डापु” गँगने मोदींना सत्तेतून हटवण्याचे कार्यक्रम आखले. त्याकरता न्यायालये, केंद्रीय तपस यंत्रणा, मानवाधिकार संघटना, युरोप आणि अमेरिकन सरकारे, मोदींना विजा बंदी आणि अमित शहांची अटक आणि तडीपारी असे विविध खेळ केले गेले आणि प्रत्येक वेळी मोदी- शहांनी त्यातून मार्ग काढला.
संत सोहराबुद्दीन शेखची हत्या आणि अमित शहांची अटक- तडीपारी…
राजस्थानच्या संगमरवर खाण मालकांना बंदूक दाखवून गुजरात मध्ये राहणारा सोहराबुद्दीन शेख वर्षाला २०० कोटींच्या वर खंडणी जमा करत असे. त्याला गुजरात पोलिसांनी चकमकीत ठार मारला. “डापु” गँगने याचा फायदा उठवून मोदी आणि त्यांचा उजवा हात अमित शहांना अडकवण्यासाठी खंडणी बहाद्दर सोहराबुद्दीनला संत पदावर पोचवले. शहांची अटक झाली, कित्येक कद्दावर पोलीस अधिकारी जेलमध्ये गेले, नंतर जामिनावर बाहेर आल्यावर शहांची तडीपारी झाली. शहांच्या अटकेच्या निमित्ताने मोदींना सत्तेतून खाली खेचून जेलमध्ये टाकण्याची खेळी होती पण ती फसली.
संत सोहराबुद्दीनचा मोदींना अडकवण्यासाठीचा वापर सामान्य गुजराती जनतेला भावला नाही. जमिनीवर मोदींच्या वीज आणि अन्य पायाभूत सुविधांच्या जोरदार सुधारणांमुळे जनमानस त्यांच्या सोबत होतं पण याची गंधवार्ता “डापु” गँगला नव्हती. आपणच बोलून आपणच ऐकायचं या मनस्थितीत ते उच्चरवात आणि एकसुरात मोदींना ठोकत राहिले आणि २०१४ ला त्यांना पंतप्रधान करण्यात त्यांनी हातभार लावला.
“डापु” गँगची वैचारिक कमजोरी!
गुजरात मध्ये मोदी- शहांना भाजपमधून विरोध होत होता. पण “डापु” गँगने केलेल्या बिभत्स, घाणेरडा, द्वेषपूर्ण प्रचार सामान्य गुजराती जनतेला मोदींच्या मागे एकजूट करत राहिला. भाजपमधल्या मोदी विरोधकांना डापुच्या आक्रस्ताळ्या प्रचारामुळे जनतेचं समर्थन मिळालं नाही, फलश्रुती एका साध्या, केसेसमध्ये फसलेल्या गुजराती आमदाराला एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष होता आलं आणि आता तोच माणूस देशाचा गृहमंत्री आहे.
मराठी “डापु” गँगचे भावविश्व आणि २०२४ ची लोकसभा…
दिल्लीचे आणि महाराष्ट्रातले डावे आणि पुरोगामी यांच्यात गुणात्मक फरक आहे. २३ मे २०१९ च्या सलग दुसऱ्या भाजप लोकसभा विजयानंतर २ जून २०१९ ला दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या परिणामांवर एक चर्चा आयोजित केली होती. त्यात डापु शिरोमणी शेखर गुप्तांचं भाषण होतं. त्याचा सारांश हा होता कि, जनधन योजना, मुद्रा कर्ज योजना, सरकारी बाबू आणि राजकारणी यांचे पाय नं धरता सामान्य नागरिकांच्या खात्यात दरमहा थेट अनुदान जमा करणारी डीबीटी योजना, शौचालये आणि गॅस सिलिंडर वाल्या योजना यामुळे भाजप सरकार ने केलेलं काम तळागाळात लाभार्थी निर्माण करून गेलंय आणि अश्या करोडो ग्रामीण लाभार्थींना “चौकीदार चोर है” हा नारा भावत नाहीच उलट तो खोटा वाटतो त्यामुळे भाजप सलग दुसऱ्यांदा जिंकली.
शेखर गुप्तांसारखे दिल्लीचे डापु गँग वाले सत्य आणि अर्धसत्याचं उत्तम ब्लेंड विकणारी सराईत व्यापारी गँग आहे. याउलट मराठी डावे आणि पुरोगाम्यांचं भावविश्व अतिशय वेगळं आहे. आपण मराठी डापु गँगच्या कोणत्याही माणसाचं लिखाण वाचा तो सरळ म्हणतो मागच्या ९ वर्षात दाखवण्यायोग्य एकही काम मोदी सरकारने केलं नाही! देशातले करोडो सामान्य लोक जेव्हा मोदी सरकारच्या कामाची फळं चाखत आहेत तेव्हा हे बिनधास्त असं कसं म्हणू शकतात?
मराठी डापु गँगला मोदींना हरवायचं आहे पण ते करताना त्यांना आपला माल अर्थात विचार सामान्य मतदाराच्या गळ्यात मारायचं मूलभूत तंत्र कळत नाही. त्यामुळे ते वाटेल ते दावे करून आपलं हसं करून घेतात.
डापु गँगचे पुण्यातले एक सन्माननीय सदस्य वकील आहेत. त्यांची पत्नीही वकील आहे. मागच्या फडणवीस सरकारमध्ये त्यांनी आपली पत्नी सरकारी वकिलांच्या पॅनल वर चिकटवून घेतली आणि आपलं उत्पन्न चालू ठेवलं. बाहेर ते सर्वत्र भाजप विरोधात गरळ ओकतात आणि भाजपमुळे लोकशाहीला कसा धोका आहे, भारतात मुस्लिमांचं समाज म्हणून कसं खच्चीकरण सुरु आहे वगैरे सांगतात.
या गँगचे अजून एक सन्माननीय सदस्य टीव्हीवर घटस्फोट, बलात्कार, पर्यावरण रक्षण, विदेशनीती, जल संधारण, आरटीआय, घाना मधील दुष्काळ, पिगासस हेरगिरी, ठाकरे- शिंदे कोर्ट खटला, लव जिहाद, हिंदू मूलतत्त्ववाद अशा प्रत्येक मुद्दयावर अधिकार वाणीने बोलायला येतात, ते “राष्ट्रीय सगळ्यातलं सगळं कळतं समाज” चे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. मोदींनी गेल्या ९ वर्षात अक्षरशः काहीही केलं नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे!
या गँगचे एक महत्वाचे सदस्य अण्णा आंदोलनात दिल्लीत तळ ठोकून होते आणि तेव्हा काही कोटी रोख मारून मुंबईत आले, बॅग ठेऊन परत गेले तर दिल्लीच्या मूलनिवासी चोरांनी- केजरीवाल गँगने त्यांना मुंबईत हाकलून लावलं. नोटबंदीत हे घबाड फुकट गेलं तेव्हापासून हे फार्फार भडकलेले आहेत आणि आता “हिंदुत्व म्हणजे ब्राम्हणवाद” आहे बहुजनांनी याला बळी पडू नये असा प्रचार करतात. मोदीचे देशाला कोणतेही योगदान नाही हे यांचंही मत आहे.
डापु गँगचे एक तुलनेने नवे सदस्य एका मराठी टीव्ही चॅनलला संपादक आहेत, हि संपादक म्हणून त्यांची वेगवेगळ्या टीव्ही- न्यूजपेपर मिळून ५ वर्षातली सातवी टर्म आहे. हे महाशय “आयडिया ऑफ इंडिया धोक्यात”, “तुकाराम महाराज- शाहू-फुले-आंबेडकर- संविधान” असे ठरलेले २५ शब्द एकमेकात घुसवून व्याख्यान देत राज्यभर फिरतात. आज त्यांच्या तथाकथित “व्याख्यानात” ते कोणते मोती वाटून आले हे ते तात्काळ फेसबुकवर टाकतात आणि “आयडिया ऑफ इंडिया धोक्यात”, संविधान वगैरे वगैरे उलट सुलट लिहून पाल्हाळिक पोस्ट संपवून पुढे जातात. अरुण साधुंच्या “मुंबई दिनांक” मधलं रघु नावाचं स्वप्नाळू, भ्रमिष्ट- वैचारिक गोंधळाच्या गर्तेत फसलेलं पात्र जर प्रत्यक्षात जिवंत असेल तर ते कसं असेल त्याचं हे संपादक उत्तम उदाहरण आहेत.
गावातला बंड्या आणि मराठी डावे आणि पुरोगामी लोकांचं भावविश्व …
प्रत्येक गावात एक तरी बंड्या नावाचं पात्र असतं. शारीरिक काम करण्याची क्षमता आहे पण तयारी नाही; एक दमडी कमवायची नाही आणि दिवसभर गावभर फिरत राहायचं, सकाळी घरचा पहिला चहा पिऊन झाला कि कपडे चढवून बाहेर पडायचं आणि ज्या दिशेने स्पिकरचा आवाज येईल तिकडे जायचं. साखरपुडा, लग्न, बारसं, सत्यनारायणाची पूजा, बारावा, तेरावा कार्यक्रम काहीही असो तिकडे जाऊन अड्डा ठोकायचा, दोनदा जेवण, मिळेल तितका चहा आणि मग वरातीत बेभान नाच करून रात्री झोपायला घरी, असा या प्रत्येक गावच्या “बंड्या” चा दिनक्रम असतो.
काही महिन्यांपूर्वी राहुल जींची “भारत जोडो यात्रा” महाराष्ट्रातून गेली तेव्हा हे समस्त डापु गँगवाले “बंड्या” या यात्रेत सकाळच्या पहिल्या चहापासून रात्री वरातीचं चहापान होईपर्यंत असे रोज सामील झाले- काही प्रत्यक्ष, काही सोशल मीडियावर! काँग्रेसने देशपातळीवर जोर धरला नाही आणि २०२४ ची लोकसभा भाजप विरुद्ध सगळे अशी झाली तर परिस्थिती कठीण होईल हे जाणून भाजपने “भारत जोडो यात्रा” यशस्वी व्हावी म्हणून आपले सगळे नेते- प्रवक्ते आणि मीडिया या यात्रेच्या मागे लावले आणि यात्रा सतत मीडियात पहिल्या पानावर राहील याची काळजी घेतली. पण हे कळेल तर ते डावे आणि पुरोगामी कसचे? यांनी आपल्या लेखण्या झिजवून भाजप या यात्रेमुळे कसा घाबरला हे सांगण्याचा चंग बांधला आणि भाजपच्या योजनेला हातभार लावला!
मराठी डापु गँगचं भावविश्व हे असं आहे. बाहेरच्या जगाशी काडीचा संबंध नाही. जनतेला मोदी सरकारच्या कोणत्या कामाचा फायदा होतोय आणि मोदी विरोधात भावना कोणत्या मुद्द्यावर आहेत याचा गंध नाही.
मराठी “डापु” टोकाचे अहंकारी, व्यासंगाने शून्य, आपल्याच कंपूत राहून स्वतःला विचारवंत मानणारे, नियतीने मोदींना हरवण्याची जबाबदारी फक्त आपल्याच खांद्यावर टाकल्ये असा भ्रम बाळगणारे, संघ- भाजपच्या मोठ्या लोकांशी उत्तम, मधुर वैयक्तिक संबंध ठेऊन आपल्या पानात मिळेल ते पाडून घेऊन पोट भरल्यावर मोदींना हरवण्यासाठी आपली लेखणी झिजवणारे, अरुण साधूंच्या “रघु” चे अवतार आहेत. यात त्यांच्या वेळेचा अपव्यय होतो आहे आणि त्यांच्या विरोधकांची करमणूक!
यांच्यासारख्या सुमार अकलेच्या “डापु गँग” ने मोदी-शहांना दोनदा दिल्लीच्या सिंहासनावर बसण्यात मोठा हातभार लावला आणि तिसऱ्यांदा, चौथ्यांदा- पाचव्यांदाही ते हातभार लावणार, आपण यात काय करणार?
—- विनय जोशी