नवी दिल्ली : संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा म्हणून ग्रॅमी अॅवॉर्डकडे पाहिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याला ग्रॅमीमध्ये ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं आहे. एखाद्या नेत्याला ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे.
हे गाणे प्रामुख्याने बाजरीची लागवड आणि त्याची उपयुक्तता सांगते. यासोबतच इतर कडधान्यांचे महत्त्व यात सांगण्यात आले आहे. मुंबईत जन्मलेली गायिका-गीतकार फाल्गुनी शाह हिचे स्टेज नाव फलू आहे. ती व तिचा पती गायक गौरव शाह यांनी बनवलेल्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या गाण्यात पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या आणि दिलेल्या भाषणाचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. या गाण्यात फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्याबरोबरच मोदीदेखील दिसतात.
‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याबद्दल बोलताना फाल्गुनीने ट्वीट केलं होतं की,”धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत हे गाणं लिहिलं आहे”. फाल्गुनी शाह आणि तिचे पती व गायक गौरव शाह यांनी ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्याची निर्मिती केली आहे. ‘एबंडेंस इन मिलेट्स’ या गाण्यासह आणखी सहा गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे. फाल्गुनी शाह यांना 2022 मध्ये ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
ग्रॅमी २०२४ च्या यादीत एकूण सात गाण्यांना ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यामध्ये ‘शॅडो फोर्सेस’साठी अरुज आफताब, विजय अय्यर आणि शेहजाद इस्माइली, ‘अलोन’साठी बर्ना बॉय, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट, तसेच ‘पश्तो’ साठी राकेश चौरसियांना नामांकन मिळालंय, याशिवाय ‘टोडो कोलरस’ या गाण्यांचा समावेश आहे.