Mohali : मोहालीत कडाक्याची थंडी, भारताचे खेळाडू सराव करताना गारठले.. पहा VIDEO

 Mohali : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच ११ जानेवारीला होणार आहे. आजचा सामना पंजाबच्या मोहाली क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टी-२० क्रिकेटसाठी तमाम क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माही बऱ्याच दिवसांनी टी-२० खेळताना दिसणार आहे. सामन्याच्या संदर्भात खेळाडूंमध्ये उत्साह असताना थंडीने मात्र सगळ्यांनाच गपगार केले आहे. सामन्यापूर्वी सर्वच खेळाडू थंडीने थरथर कापत आहेत, ज्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला आहे.

बीसीसीआयने खेळाडूंचा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू मैदानात सराव करताना दिसत आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतच क्षेत्ररक्षण प्रशिक्षकही खेळाडूंसोबत दिसत आहेत. थंडीबाबत सर्व खेळाडू आपापली मते मांडत आहेत. सर्वच खेळाडू गरम कपडे घालून मैदानात सराव करत होते. प्रचंड धुकं पडलेलं मैदानात त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होतं. मोहालीत खूप थंडी असली तरी खेळायला मजा येईल, असा सगळ्यांचा विश्वास आहे. रिंकू सिंगपासून ते अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल सुद्धा थंडीबाबत प्रतिक्रिया देत आहेत

पहिला टी-२० सामना हा संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे, त्यामुळे दोन्ही संघांना कडाक्याच्या थंडीचा सामना करत खेळावरही लक्ष केंद्रित करायचे आहे. दोन्ही संघांसमोर एक नव्हे तर दोन आव्हानं उभी असणार आहेत. या सामन्यादरम्यान मोहालीचे हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. पावसाची शक्यता नाही. पण दव मात्र खूप असण्याची शक्याता आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक खूप महत्त्वाची भूमिका बजावेल.

अफगाणिस्तानचा संघ प्रथमच टी-२० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. पण या सामन्यात त्यांचा महत्त्वाचा खेळाडू आणि टी-२० संघाचा कर्णधार रशीद खान खेळताना दिसणार नाही, कारण तो अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. अफगाण संघ भारताविरुद्ध पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. अफगाणिस्तान संघाने आजपर्यंत भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. कसोटी सामना असो, एकदिवसीय सामना असो किंवा टी-२० सामना असो, अफगाणिस्तानला अद्याप भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही.