Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या 1 वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 दरम्यान त्याला दुखापत झाली होती. घोट्याच्या दुखापतीमुळे शमीवर फेब्रुवारी 2024 मध्ये शस्त्रक्रिया झाली.
दरम्यान , तो आत्ता रणजी ट्रॉफीमधून मैदानात उतरला आहे. बंगालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध बंगाल या सामन्यात शुक्रवारी मोहम्मद शमी जखमी झाला. गोलंदाजी करताना त्याला पाठीची समस्या जाणवली. मोहम्मद शमी गोलंदाजी करताना सामन्याच्या मध्येच खाली बसला. त्यावेळी त्याच्या पाठीत खुप दुखत होते. शमीची खराब स्थिती पाहून वैद्यकीय पथकाला मैदानात यावे लागले.
मोहम्मद शमीला वेदना होत असल्याचे पाहून सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली, यावेळी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय पॅनेलचे प्रमुख नितीन पटेल हेही मैदानावर उपस्थित होते. मात्र, अल्प उपचारानंतर शमीने पुन्हा गोलंदाजी करत आपले षटक पूर्ण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पडल्यावर शमीला थोडासा धक्का बसला असेल, पण कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अशा स्थितीत तो या स्पर्धेत पुढे खेळताना दिसणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये करू शकतो प्रवेश
टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारतीय निवड समितीने 18 खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. पण अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या संघाचा भाग नाही. गेल्या एक वर्षापासून तो दुखापतीने त्रस्त होता आणि संघाची घोषणा होईपर्यंत तो तंदुरुस्त होऊ शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीचा या सीरिजदरम्यान टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.