भारताची प्रगती होवू नये यासाठी काही लोकांचे प्रयत्न : मोहन भागवत

नागपूर : काही लोक भारताची प्रगती होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. ते सामाजिक सद्भावना राहू नये यासाठी अडथळे आणतात. ते चुकीच्या व तथ्यहिन गोष्टींचा प्रचार-प्रसार करतात. कलह वाढावा, अराजकता पसरावी, कायद्याबाबत सन्मान राहू नये यासाठी ते प्रयत्न करतात. ते अनेकदा जाती-पंथाच्या नावाखाली लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या जाळ्यात नागरिकांनी फसू नये. राष्ट्रविरोधी तत्वांचा निर्भयतेने निषेध व प्रतिकार करणे गरजेचे असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

विजयादशमीनिमित्त नागपुरातील रेशीमबाग येथे डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी पर्वतारोही संतोष यादव उपस्थित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमानेदेखील उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज नवनवीन बदल होत आहेत. देशाचे वजन वाढत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबत आपण स्वावलंबी होत आहोत. अर्थव्यवस्था आता सुधारत आहे व तिची प्रगती होईल असे अंदाज वर्तविण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात जगात आपले खेळाडू कर्तुत्व दाखवत आहेत. कर्तव्यपथ आत्मनिर्भर भारत होत आहे. मात्र आपला आत्मा काय आहे याबाबत नेतृत्व, नागरिक व समाजात स्पष्टता हवी. प्रगतीचा मार्ग सरळ नसतो, त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. लवचिकता ठेवावी लागते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

रोजगार आर्थिक स्वतंत्रतेतून निर्माण होतो. रोजगाराभिमुख, शोषणमुक्त अर्थव्यवस्था असली पाहिजे. मात्र त्यासाठी संयम असायला हवा व भोगवादी वृत्तीतून बाहेर पडले पाहिजे. लोकांनी वैभवाचे अनावश्यक प्रदर्शन टाळले पाहिजे. स्वार्थाला मनातून दूर करायला हवे, तर शोषणमुक्त अर्थव्यवस्था हवी. नोकरीच्या मागे पळणे कितपत योग्य आहे याचा विचार हवा. लोकसंख्येच्या तुलनेत नोकर्‍या २० ते ३० टक्केच असतात. त्यामुळे उद्योजकतेची वृत्ती वाढायला हवी. एक सरकार, एक नेता बदल घडवू शकत नाही, असेही भागवत यावेळी म्हणाले. २७५ जिल्ह्यांत रोजगार देण्यासंदर्भात स्वयंसेवकांकडून कार्य सुरू झाले आहे. लघुउद्योग, सहकार, कृषी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार. यात समाज सर्वाधिक सहभागी असतात. सरकार जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतात की नाही यावर सर्वांनी लक्ष ठेवले पाहिजे. मात्र समाजानेदेखील पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.