VIDEO : अखंड भारत अन्‌ आरक्षणावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान, म्हणाले…

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरातील श्री अग्रसेन छात्रावासात सरसंघचालकांनी काल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी एका विद्यार्थ्याने डॉ.भागवत यांना अखंड भारत कधी होईल? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी अखंड भारत कधी होईल व त्याची मुळ संकल्पना काय आहे, हे स्पष्ट केले.

अखंड भारत कधीपर्यंत होईल’ असा प्रश्न विचारल्यावर मोहन भागवत म्हणाले, अखंड भारत कधीपर्यंत होईल, हे मी सांगू शकत नाही. ज्योतिषाकडे पाहायला लागेल. पण, तरुणांनी ठरवले तर त्यांच्या म्हातारपणाआधीच अखंड भारत होईल. अखंड भारत म्हणजे केवळ नकाशावरच्या रेषा पुसणे नाही. त्यासाठी आमच्या नजीकच्या देशांमध्ये भारतीयत्व रुजवणे आवश्यक आहे.

भारतापासून वेगळे झालेले अनेक देश आज चूक केली, हे मान्य करतात. आम्ही एकाच भारतभूमीचे अंग आहोत. अखंड भारतात यायचे असेल तर त्यांना स्वार्थ, कट्टरता आणि फुटीरवाद सोडावा लागेल. त्यावेळी काहीही बदल न करता सगळे एक होऊ. आम्ही आजही नजीकच्या देशांना मदत करतो. कारण, आम्ही सर्व एकाच भारत मातीत जन्मलो आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं.

आरक्षणावर भाष्य करतांना ते म्हणाले की, भारताला सामाजिक विषमतेचा मोठा इतिहास आहे. आमच्याच बांधवांना आम्ही जातींवरून पशुसारखी वागणूक दिली. दोन हजार वर्षे अनेक लोक गुलामीचे जीवन जगले. महाभारतातही जातीपातीची उदाहरणे दिसतात. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत आणि भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे. संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितलं.