मोहिनी एकादशी व्रत : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात.१ मे २०२३ रोजी मोहिनी एकादशी येत आहे. हिंदू धर्मानुसार, मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरूपाचे विधिवत पूजन केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
या दिवशी हे व्रत कर्त्याने पूर्ण दिवस उपास करावा आणि भगवान विष्णूंची उपासना करावी. मोहिनी एकादशीला भगवान विष्णूचे मोहिनी रूप मानले जाते. धार्मिक मान्यता अशी आहे की मोहिनी एकादशीचे व्रत ठेवल्याने सर्व दु: ख दूर होतात आणि व्यक्ती सर्व बंधने व आसक्ती यापासून मुक्त होते.
जाणून घ्या पूजा विधी
मोहिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी सकाळी उठून स्नान करावे. धूत वस्त्र परिधान करून त्यानंतर, पूजास्थळावर बसून भगवान विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा यांची पूजा करावी. भगवान विष्णूला प्रिय असणारी तुळशी, फुले, फळे वहावीत. विष्णू सहस्त्र नाम म्हणावे किंवा ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. त्यानंतर विष्णूची किंवा विठ्ठलाची आरती करावी. पूर्ण दिवस उपास करावा. गरजूंना अन्नदान करावे. दुसर्या दिवशी देवपूजा करून उपास सोडावा.
भगवान विष्णूनी मोहिनीचे रूप धारण केले जाणून घ्या कथा-
हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, समुद्र मंथनानंतर बाहेर ;पडलेला अमृत कलश मिळवण्यासाठी देवता आणि राक्षसांमध्ये वाद झाला. हा वाद पाहून देवतांनी भगवान विष्णूची मदत मागितली. मग राक्षसाचे लक्ष कलशांतील अमृतापासून दूर करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. भगवान विष्णूचे सुंदर स्त्रीरूप पाहून राक्षस आकर्षित झाले. त्यावेळेस देवांनी अमृत प्राशन केले. ही घटना वैशाख महिन्याच्या शुक्ल एकादशीला घडली असे म्हणतात. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. व या दिवशी भगवान विष्णूच्या मोहिनी स्वरूपाची पूजा केली जाते.