मान्सून अंदमान-निकोबारात आज धडकण्याची शक्यता

तरुण भारत लाईव्ह । १९ मे २०२३। हवेचा वाढलेला दाब, बाष्पीभवनाची वाढलेली प्रकिया तसेच अनुकूल वातावरण यामुळे मान्सून अंदमान- निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात शुक्रवार पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या देशात उष्णतेची तीव्र लाट आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतात मागील काही दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशाच्या जवळपास आहे. अशीच स्थिती बंगालच्या उपसागरासह अंदमान – निकोबार बेटांमध्ये तयार झाली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक असलेले अनुकूल वातावरण म्हणजेच बंगालच्या उपसागरात एक हजार हेक्टा पास्कल हवेचा दाब तयार झाला आहे. हवेचा कमी दाब असे तिकडे वारे मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून नेतात.

अशीच क्रिया आता बंगालच्या उपसागरात सुरु झाली आहे. हिंदी महासागरात हवेचा दाब वाढला आहे. या दोन्ही प्रक्रियांमुळे मान्सूनच्या हालचाली वाढण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. या परिणामामुळे बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागासह दक्षिण अंदमान- निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

तर केरळमधेही वेळेच्या आधी
वास्तविक पाहता उपसागरासह अंदमान- निकोबार बेटांवर १८ ते २२ मेच्या दरम्यान मान्सून दाखल होत असतो मात्र  या वर्षी एक ते दोन दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. वातावरण असेच अनुकूल राहील्यास केरळमध्येही मान्सून वेळेत किंवा वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.