मुंबई : शेतकऱ्यांसह सर्व नागरिक चातकाप्रमाणे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सर्वांना हवाहवासा वाटणारा, धरणीमायला तृप्त करणारा, तप्त वैशाखच्या उष्णतेपासून सुटका करणारा, पशु-पक्ष्यांची तहान मिटविणारा मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सध्या त्याचा मुक्काम तळकोकणात आहे. पुढील काही दिवसांमध्ये तो उर्वरित महाराष्ट्रात मुक्कामाला निघणार आहे. मान्सूनच्या आगमनाची शुभवार्ता हवामान खात्याने दिली आहे.
एरवी ७ जूननंतर येणारा मान्सून यावर्षी केरळमध्ये आठ दिवस आधीच दाखल झाला आहे. रविवारी तळकोकण गाठल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत तो मुंबईत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनचे यंदा सामान्य तारखेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये आगमन झाले. याआधी मान्सून २००९ साली २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर १६ वर्षांत मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मान्सून पुढील २ दिवसांत संपूर्ण गोवा व्यापणार आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापणार आहे. यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल १२ दिवस आधी राज्यात पोहोचला आहे.
मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला.
