Jalna news : जालनाच्या वडीगोद्रीजवळ कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी (१९ मे) रोजी सकाळी घडली. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एकाचवेळी काळाने माय-लेकीला हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रानुसार, रोहिणी अमरदीप चव्हाण (३० ), नुरवी अमरदीप चव्हाण (अडीच ) असे मृत माय-लेकीचे, तर अमरदीप बाबूराव चव्हाण (४०),विश्रांती प्रदीप चव्हाण (२९ ), रुद्रांश प्रदीप चव्हाण (२) असे जखमींचे नाव आहे. लातूर येथील चव्हाण कुटुंब हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला आहेत. सोमवारी (१९ मे) रोजी सकाळी गावाकडे आनंदाने रवाना झाले होते.
दरम्यान, धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्रीजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटली. या अपघातात चव्हाण कुटुंबातील माय-लेकीचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एकाचवेळी काळाने माय-लेकीला हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वाहनचालकांनी वाहन वेगाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.