पाचोरा : लग्नाच्या १६ वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या मातेचा प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना येथील बाहेरपुरा भागात घडली. ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) असे मृत मातेचे नाव असून, या घटनेमुळे ज्योतीचा माहेर व सासरचा परिवार दुःखसागरात बुडाला आहे.
पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३७) हिला लग्नाच्या १६ वर्षांनंतर बुधवार, १९ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावरील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये मुलगी, मुलगा अशी दोन बाळं जन्माला आली. दोन्ही बाळं जन्माला आल्यानंतर तीन तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योती चौधरी यांचे सायंकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.
या घटनेने महिलेचा पती, आई, वडील, भाऊ यांनी आक्रोश केला. विवाह होऊन १६ वर्षे झाली, तरी बाळ जन्माला येत नव्हते. म्हणून ज्योतीच्या पतीने व आई-वडिलांनी ट्रिटमेंट केली. गेल्या नऊ महिन्यांपासून ज्योतीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
दरम्यान, बुधवारी (१९ मार्च) ज्योतीला प्रसवकळा सुरू झाल्या आणि मुलगा व मुलगी अशा दोन बाळांना तिने जन्म दिला. पती-पत्नी व आई-वडिलांना आणि ज्योतीच्या दोन्ही भावांना आनंद झाला. मात्र, तीन तासांनंतर त्या आनंदावर विरजण पडले. त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. बाळाच्या आईला हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाला.
घटनेमुळे ज्योतीचा माहेर व सासरचा परिवार दुःखसागरात बुडाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी (२० मार्च) सकाळी दहाला ज्योती चौधरीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.