हिंगोली : शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे समर्थक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र, आता ठाकरे गटाच्याच एका खासदाराने उद्धव ठाकरेंचे खरंच चुकले असे म्हणत थेट नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवले जात आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाच्या एका खासदाराने उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कुणी केलं हे वक्तव्य?
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात शिवगर्जना अभियान सुरू आहे. आज हिंगोलीच्या औंढा शहरात या अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी मुलाला मंत्री करायला नको होतं, आणि मुलाला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं,” असे विधान त्यांनी केले आहे.
तसेच याबद्दल पुढे बोलताना “दोघेही मंत्री झाल्यामुळे पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही आणि गद्दारांना संधी मिळाली असल्याचे विधान खासदार बंडू जाधव यांनी केले आहे. तसेच आदित्य ठाकरेंना मंत्री केल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली असल्याचे” देखील यावेळी खासदार बंडू जाधव म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा होत आहे. रत्नागिरीमधील खेडमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या कोणावर हल्लाबोल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.